Latest happenings and reverts in India affecting relationship, understanding relationships advice on realtionships,communication, relationship therapy,original honest touching lives, bridging distances, healing rifts and building bonds e-realtionship attachments theory by Amritanshu
Monday, October 06, 2008
नारायणी नमोस्तुते
"या देवी सर्व भूतेषु शक्ति रुपेण संस्थिता
नमःतस्यै, नमःतस्यै, नमःतस्यै नमो नमः''
अशी अंबेची आराधना करण्याचे हे दिवस. आदिमायेच्या भजनात, पूजनात गुंग होण्याचे दिवस. नवरात्र- म्हणजे नऊ रात्री. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत. आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना होऊन माता दुर्गेचा उत्सव सुरू होतो. या नवरात्रामध्ये अंबेची पूजा करण्याची प्रथा भारतभर आहे. गुजरातमधील "गरबा'', कर्नाटकातील "यक्षगान'', आंध्रप्रदेशातील "रामलीला'', महाराष्ट्रातील "भोंडला'' व "देवीचे जागरण'' या आपल्या देशातील परंपरा आहेत.
पावसाळा सरतो आणि थंडीचा मागोवा देणाऱ्या शरदाची नांदी लावत आश्विन मास अवतरतो. शुद्ध प्रतिपदेपासूनच नवरात्र महोत्सवाला भारतभर प्रारंभ होतो. या महिन्याचे मूळ नाव आहे "ईष'' म्हणजे उडून जाणे. जेव्हा अनेक महिने सतत वर्षणारा पर्जन्यपक्षी उडून जातो तेव्हा ईष म्हणजे आश्विन मास सुरू होतो. मनाला ओलावा देणारा, सृष्टीला हिरवा शालू नेसवणारा, चातक पक्षाची तहान भागविणारा पाऊल गेल्याने मन उदास होते. पण विश्वव्यापी, त्रिगुणात्मक आदिमायेचे नवरात्र या उदासीनतेला उत्साहाची झालर कधी चढविते कळतच नाही. हा उत्सव दुर्गादेवीचा, शस्त्र पूजनाचा व सीमोल्लंघनाचा असा आशय घेऊन अपार उत्साहाने देशभर साजरा होतो. शिवरायांच्या संग्रामशील व कालोचित अशा सीमोल्लंघनाच्या पायंड्याने नवरात्राला एक जबरदस्त ऐतिहासिक परिणाम बहाल केला.
यामागची इतिहासात प्रचलित असलेली कथा अशी आहे. एकेकाळी देवांच्या नाशासाठी "दुर्गम'' नावाच्या असुराने घनघोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून देवांची ताकद असणारे चारही वेद मागून घेतले. या असुरामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते, तेव्हा ब्रह्मवृंदाच्या व्याकुळतेला स्मरून आदिमातेने उन्मत्त दुर्गम असुराचा वध केला. दुर्गमचा वध केल्यामुळे हिला "दुर्गा' म्हटले जाते. याच देवीला पुढे काली, अंबा, भवानी असेही म्हटले गेले.
नवरात्राचा पहिलाच दिवस घटस्थापनेचा. या दिवशी मातीच्या वेदीवर घटाच्यावर पसरलेल्या ताम्हणात कुलदेवतेच्या प्रतिमेची व कुलदेवाच्या टाकांची प्रतिष्ठापना करून घटाभोवती पसरलेल्या निवडक मातीच्या गादीवाफ्यात गहू, ज्वारी, मका अशी सप्त धान्ये पेरली जातात. या दिवशी घटाजवळ लावलेला दिवा नऊ दिवस - रात्र तेवत राहणार असतो. या दिवसापासून घटाला प्रत्येक दिवशी एक माळ किंवा पहिल्या दिवशी एक, दुसऱ्यादिवशी दोन अशा वाढत्या क्रमाने बांधल्या जातात. ही माळ विशेषतः झेंडूच्या फुलांची असते.
पंचमीच्या दिवशी "ललितापंचमी'' चे व्रत करतात. यादिवशी ललिताअंबेला न खुडलेल्या दुर्वांच्या बेचाळीस पेंड्या वाहण्याची प्रथा आहे. दांपत्य पूजन केले जाते. रात्री जागरण हरीकथा कथन केले जाते.
अष्टमीच्या दिवशी चित्पावन ब्राह्मणात "महालक्ष्मी'' पुजिली जाते. हा महालक्ष्मीचा जागर घागर फुंकून केला जातो. यावेळी फक्त " फू..फू..'' एवढाच आवाज वातावरण निर्मिती करतो. तांदळाच्या पिठापासून तयार केलेला देवीचा मुखवटा दागदागिन्यांनी, फुलांनी सजविला जातो. नवीन लग्न झालेले असेल तर पहिल्या वर्षी नवपरिणीतेच्या सासरी किंवा माहेरी मोठ्या हौसेने महालक्ष्मीपूजन केले जाते. नवीन सुनेला घागर फुंकायला लावतात, नाव घ्यायला लावतात.
"अग अग वहिनी ये ना इकडे, महालक्ष्मी आहे बघ पुढे
साजण आहे ग तुझा तिकडे, आज तरी तू पाहा ना इकडे''
हे सगळे चालत असताना आपली राणी कशी घागर फुंकते हे पाहण्यास नवरोबा कुठेतरी लपून राहिलेले असतात. सगळंच प्रसन्न वातावरण! रात्र फुगड्यास, घागर फुंकण्यास खरं तर कमीच पडते पण महालक्ष्मीचे विसर्जन पहाटेच करावयाचे बंधन असते. गावामध्ये समज आहे की विसर्जनापूर्वी जर देवीच्या मुखवट्याला भेगा पडल्या तर आपल्या पुजेमध्ये काहीतरी चूक झाल्याचे निष्पन्न होते. याच दिवशी शाळांमध्ये ज्ञानाची देवता सरस्वतीचे पूजन केले जाते.
नवमीला "खड्गनवमी'' म्हणतात. यादिवशी घरातील शस्त्रे - अस्त्रे पुजिली जातात. हीच शस्त्रे इतिहासात विजय-पराजयाशी निगडित असायची. त्यामुळे त्यांना पुजायची प्रथा आहे. नवरात्रांमध्ये महत्त्वाचे दिवस म्हणजे पंचमी, अष्टमी आणि नवमी. प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे दुर्गासप्तशतीच्या एकेका पाठाचे पठण केले जाते.
दहावा दिवस म्हणजे दसरा. पौराणिक कथांनुसार आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत देवांविरुध्द राक्षसांचे युद्ध चालले होते. दहाव्यादिवशी विजया रुपी पार्वतीने विजय मिळवून काशीत प्रवेश केला म्हणून या विजयी दिवसाला "विजयादशमी'' म्हणूनही संबोधले जाते. या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते. रामाने रावणाशी युद्ध करून त्याचा वध केला व पांडवांनी वनवासात जाताना शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रास्त्रे परत ताब्यात घेतली म्हणून शमीच्या वृक्षाला यादिवशी महत्त्व आहे. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. म्हणूनच या दिवशी नवीन कामाचा श्रीगणेशा केला जातो. घरातील कर्ता पुरुष यावेळी सीमोल्लंघन करतो. यादिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात.
गोव्यात देवळांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त देवीसाठी सजविण्यात आलेली मखरे पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येतात. अंत्रुज महालातील देवळातील मखरोत्सव तर फार प्रसिद्ध आहे. यादिवशी देवीला अशाप्रकारे सजविले जाते की जिला पाहताच वाटते ती आपल्याशीच हितगूज करते. तिचा चेहऱ्यावरचा भाव तिचे दागदागिने, फुलांपेक्षा जास्त उठावदार व बोलका असतो. देवीला मखरात बसवून झोके दिले जातात यावेळी मंत्रघोषाने सारे देऊळ मंत्रमुग्ध झालेले असते. भक्तीचा सागर गरजत असतो, त्यातील भाव उफाळत असतो, अन् भक्त या संगमात कधीच न्हाऊन निघालेला असतो.
आपले सारे सण हे असेच मनाला समाधान देणारे. कितीही ताण असला तरी आईच्या भक्तीत लोक सारे विसरतात. कारण सारे वातावरण पावित्र्याचे, मांगल्याचे आणि सौख्याचे. अशा या नवरात्रीच्या निमित्ताने आपण सर्वांनाही आमच्यातर्फे नवरात्रीच्या शुभेच्छा.
"टिपऱ्या, टाळ्यांचा गजर, आहे "आई'' चा जागर, जाती - भेद विसरून एक होऊ
धुंद होऊन, फेर धरून नाचू - गाऊ, नवरात्रीही आपण जागवू ''
आजकाल या नवरात्रोत्सवाला काही प्रमाणात सार्वजनिक रूप प्राप्त झाले आहे. गुजराथी समाजात गरबा, दांडिया खेळून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विविध जागी एकत्रित कार्यक्रम आयोजित केलेले असतात. गायक कलाकारांना आमंत्रित केले जाते अन् नटनट्यांच्या उपस्थितीमुळे तर हा क्षण तरुण तरुणींच्या संस्मरणीय ठरतो.
"रंगा ढंगात, तारुण्याच्या जोशात
टिपऱ्यांच्या तालात, गरबा खेळू सारी रात.''
महाराष्ट्रात यालाच भोंडला असे संबोधले जाते. यावेळी हत्तीची आकृती मधे ठेवून मुली गोल फेर धरतात व तोंडाने पुढील गीत म्हणतात.
"अडकीत जाऊ, खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता, आमचा भोंडला आत्ता''
कर्नाटकामध्ये याला " यक्षगान '' म्हटले जाते. यावेळी नाटक संवादामध्ये नाहीतर गाण्याच्या स्वरूपात सादर केले जाते. हे पाहण्यासाठी स्थानिकांपेक्षा परदेशी लोक फार येतात.
नवरात्रीतली प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या पुढील नावावरुन प्रचलित आहे.
पहिली रात्र - शैलपुत्री
दुसरी रात्र - ब्रह्मचारिणी
तिसरी रात्र - चंद्रघंटा
चौथी रात्र - कुश्मांदा
पाचवी रात्र - स्कंदमाता
सहावी रात्र - कात्यायनी
सातवी रात्र - कालरात्री
आठवी रात्र - चामुंडा
नववी रात्र - सिध्दीदात्री
Happy Navratra to all ... coming together spiritually ... bonding together for a common cause... stenthenging relationships...
Labels:
amritanshu,
Happy Naratra,
Latest Happenings,
relationship
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment